महाराष्ट्र

तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी : ना. उदय सामंत

रत्नागिरी : जिल्हयातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड जिल्हयामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केले.


राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला, माळनाका येथे महाराष्ट्रातील पहिल्या भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उद्योग विभागाचे सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जीएस हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उद्धव माने, बँक प्रतिनिधी, अण्णा सामंत, युवा हब चे संचालक किरण रहाणे, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. माझ्याकडे उद्योग खाते असल्याने त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्हयातून करण्यात आली. या नोकरी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून यासाठी ऑनलाईन 7 हजार 800 अर्ज प्राप्त झाले तसेच ऑफलाईन अर्जही मोठया प्रमाणावर प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. राज्यातील, राज्याबाहेरील, आंतरराष्ट्रीय अशा तब्बल 130 कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीच्या समुद्रकिनारी स्टील इंडस्ट्रीज उभारुन येथील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची इच्छा विश्वविख्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी एका भेटीत व्यक्त केली. तर इलेक्ट्रॉनिक मोटर्स हब रत्नागिरी मध्ये उभारण्याची इच्छा सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. परंतु येथील जनतेने मानसिकता बदलणे फार गरजेचे असल्याचे आहे, जिल्हयातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड जिल्हयामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे,असे ते म्हणाले.
कोकणातील जनता ही संयमी आहे, येथील मुलेदेखील संयमी आहेत. या मुलांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती सिध्द करुन दाखवतात, हे रत्नागिरी जिल्हयाचे वैशिष्ट्य आहे. नोकरीसाठी जिल्हाबाहेर जाण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी असणे गरजेचे आहे. याबाबत कोकणातील जनतेने मानसिकता बदलणे काळाची गरज आहे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळायला हवा, काम मिळावे म्हणून हे शिंदे-फडणवीसांचे सरकार प्रामाणिकप्रमाणे काम करीत आहे.
अशा प्रकारचे मेळावे राज्यातील प्रत्येक जिल्हयात घेण्यात येणार आहेत. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तरुण-तरुणींसाठी ऐतिहासिक असा नोकरी मेळावा सीमा भागात घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज मंजूरी पत्र वाटप करताना ना.सामंत यांनी उपस्थित तरुण-तरुणींना आवाहन केले की, नोकरी करण्यापेक्षा आपण नोकरी देणारे बनावे. स्वतःचे उद्योग उभारावेत.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील महिलांनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नर्सरीचे त्यांनी उदाहरण दिले. या महिलांसारखेच कोकणातील महिलांनी-युवतींनीही नाविन्यपूर्ण उद्योग करण्यासाठी पुढे यावे, सरकार आपल्या पाठीशी आहे, असे ते शेवटी म्हणाले.
या रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून ज्या युवक युवतींची नोकरीसाठी अंतिम निवड झालेली आहे अशांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ज्या बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या बॅकांच्या व्यवस्थापकांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी एम डी देवेंद्रसिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गोडबोले यांनी केले. प्रस्तावना कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक सतीश भामरे यांनी केली आणि आभार प्रदर्शन रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले.
या मेळाव्यानिमित्त शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, बेरोजगार युवक-युवती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button