नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजरला अटक
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण या बँकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ती काम करत असलेल्या ठिकाणच्या प्रोजेक्ट मॅनेजरला अटक केली आहे. कामाच्या ठिकाणी टार्गेट आणि ते पूर्ण करण्यासाठीचा दबाव या अँगलने पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास करणे सुरू केले आहे.
नीलिमा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी ती काम करत असलेल्या दापोली येथील एका मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम सुरेश गायकवाड (२६, मूळचा रा. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार टीआरपी रत्नागिरी ) याला अटक केली आहे. कामाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी निलीमाला सतत तिच्या मोबाईलवर गायकवाड हा संपर्क करत असे. कामाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नीलिमावर गायकवाड यांच्याकडून दबाव असल्याचे नीलिमांच्या कुटुंबीयांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी आता नीलिमाने या दडपणातूनच आयुष्य संपवले नाही ना, या अँगलने तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक तपासासाठी पोलिसांनी प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम सुरेश गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नीलिमा च्या मृत्यू संदर्भात आजवरच्या तपासात प्रथम दर्शनी काही महत्त्वाच्या बाबी निष्पन्न झालेल्या होत्या. व्हिसेराची डॉक्टरांनी सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणी अंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे. तसेच मृत्यूचे अंतिम कारण बुडून मृत्यू असे नमूद केले आहे. आत्तापर्यंत पोलिसांमार्फत चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यात आलेली आहे.
नीलिमांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार दि 15 एप्रिल ते 29 जुलै 2023 या मुदतीत, आपली मुलगी दापोली येथील ज्या बँकेमध्ये काम करत होती त्या ठिकाणी असणार्या संग्राम गायकवाडला आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लगत असे व ऑफिसमध्ये तिच्या कामाबाबत मॅनेजर संग्राम गायकवाड याच्याकडून नेहमी 15 दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता तिला वारंवार सुट्टीवर असतानादेखील फोन येत असत.
आपल्या मुलीस दिवसाला 4-5 डी-मॅट खाती उघडण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड हा जाणून बुजून दबाव आणत असलल्याबाबत सुट्टीच्या दिवशी दरवेळी आपल्याला व तिचा भाऊ अक्षय यास नीलिमा सांगत असे. प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव घातला होता व नीलिमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याबाबत धमकीही दिली होती व यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती व घरामध्ये व्यवस्थित जेवत नसल्याची देखील फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
नीलिमाचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी अन्वये दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं 17/2023 भा.द.वि.सं चे कलम 306 अन्वये भा.द.वि. संहिता कलम 306 अन्वये संग्रामला गुरुवारी रात्री 10 वा. वाजता अटक करण्यात आली आहे. याबाबत गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : Konkan Railway| यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणार मेमू स्पेशल ट्रेन!