पद्मश्री दादा इदाते यांच्या सन्मानार्थ दापोलीत उद्या सायकल फेरीचे आयोजन
दापोली : नि:स्वार्थीपणे सामाजिक कार्यात सक्रिय, अनेक प्रतिष्ठेच्या पदांवर काम केलेले, अनेक सत्कार, पुरस्कारांनी सन्मानित कोकणचे रत्न आदरणीय श्री भिकू रामजी इदाते (दादा) यांना केंद्र सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दादांच्या या समाजकार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती रुपनगर- ऐश्वर्यनगर- श्रीगुरुनगर- लष्करवाडी जालगाव- गणेशनगर- आनंदनगर- उदयनगर- आझाद मैदान अशी ६ किमीची असेल. समारोप आझाद मैदान येथे ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान जालगाव आनंदनगर येथील दादांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन घेतले जाईल. तसेच त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यात येईल.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८७६७६५०५३७, ९०२२८७४८८१ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.