बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत : हिंदू जनजागृती समिती
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे.
जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.