बारसू ग्रामस्थांना रिफायनरीबाबत वस्तुस्थिती समजाविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच
रत्नागिरी,दि. ३० : मौजे बारसू, ता.राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या अनुषंगाने प्रस्तावित गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम मंगळवार, 25 एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आलेले आहे. आजही हे काम सुरू होते, मात्र काही ग्रामस्थ यास विरोध दर्शवित आहेत. त्यांना वस्तुस्थिती समजाविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत.
बारसू येथे सुरू असलेली माती तपासणीची कामे व प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प याबाबत आज धोपेश्वर व बारसू गावांमधील ग्रामस्थांबरोबर जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर येथे बैठक घेतली.
या बैठकीस जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थित ग्रामस्थांसोबत सकारात्मक चर्चा केली.
जिल्हा प्रशासनाने गावामध्ये येऊन लोकांशी चर्चा करावी, असे उपस्थित ग्रामस्थांनी या चर्चेदरम्यान सांगितले. तसेच कंपनीकडून स्थानिक लोकांसाठी काय मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत, याबाबतचीही माहिती द्यावी, अशी मागणी केली. काही ग्रामस्थानी संबंधित गावामधील सरपंच, सदस्य, गावकरी यांना इतर ठिकाणी प्रत्यक्ष सुरू असणाऱ्या रिफायनरीची पाहणी करण्यासाठी नेण्यात यावे, यासाठी शासनाने प्रयत्न करावा, असेही सुचविले.
या बैठकीत ग्रामस्थांच्या शंकांना जिल्हा प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिली. जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष गावामध्ये येवून तेथील ग्रामस्थांशी त्यांच्या वेळेनुसार चर्चा करण्याबाबत आश्वासन दिले.