बाहेरच्या लोकांनी कोकणात लक्ष घालू नये : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : कोकणातील लोक आपले निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. बाहेरच्या लोकांनी कोकणात लक्ष घालू नये. बाहेर राहून पत्रकार परिषदा घेऊन बारसूमधील लोकांना पटवू नका, असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी कोणाचेही नाव घेता दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दोन दिवसापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना बारसूमध्ये येण्याची हाक दिली होती. बारसूतील शेतकरी एकाकी असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बारसूमध्ये यावे, असे आवाहन करत त्यांनी सरकारला आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत यांनी बाहेरच्या लोकांनी कोकणात लक्ष घालू नये, असा सल्लेवजा टोला हाणला आहे.
कोकणातील लोकांना आपल्या सुखाचे निर्णय स्वत: घेता येतात. ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यासाठी बाहेरील व्यक्तींची गरज नाही. ज्यावेळी खासदार विनायक राऊत यांना अटक झाली, त्यानंतर आंदोलन शांत होईल, असे अपेक्षित होते. मात्र मुंबईत आणि कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आंदाेलन पेटवण्यात आले, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.