महाराष्ट्र

भविष्यात सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावं लागेल : धीरज वाटेकर

जागतिक वनदिनी उक्ताड शाळेच्या विद्यार्थ्यांची वनफेरी

चिपळूण :: जागतिक वनदिन हा संपूर्ण जगात वनांसाठी वाहिलेला दिवस आहे. वृक्षांची आठवण, स्मरण, त्याची आवश्यकता आपण जाणायला हवी म्हणून आजच्या दिवसाचे प्रयोजन आहे. वनांचा मानवी जीवनाशी निकटचा संबंध आहे. आपली औषधे, उपजीविका त्यावर आहे. जैवविविधतेबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी. जंगल निर्माण आणि संवर्धनाची शपथ आपण सर्वांनी घेण्याचा आजचा प्रेरणादायी दिवस आहे. असे असले तरी दिवसेंदिवस मनुष्य अधिकाधिक वृक्षतोड करतो आहे. मनुष्याने वृक्षतोड करू नये, वृक्षसंवर्धन करावे यासाठी आपल्याला सर्वांना भविष्यात ‘वृक्षरक्षक’ बनावं लागेल असा कानमंत्र लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उक्ताडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीसह वाशिष्ठी नदीच्या किनारी भागात असलेल्या जुवाड बेटापर्यंत ‘वनफेरी’ काढून साजरा केलेल्या जागतिक वनदिन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून वाटेकर बोलत होते. यावेळी वाटेकर म्हणाले, ‘सध्याचे दिवस चैत्र पालवीचे दिवस आहे. वनराई आपल्या कोवळ्या पानांसह नवे रूप धारण करून आपल्यासमोर आलेली आहे. आपण ज्या शहरात राहातो, त्याही शहराची जमिनीतील पाणी पातळी पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे. भविष्यात पाण्याचे संकट गंभीर होण्याचा धोका आहे. पावसाच्या आणि जमिनीतील पाण्याच्या उपलब्धतेसाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. भविष्यात पिण्यासाठी पाणी हवे असेल तर आपल्या घराशेजारी आपल्याला वृक्ष लावावे आणि जपावे लागतील. यासाठी आपल्याला सर्वांना भविष्यात ‘वृक्षरक्षक’ बनावं लागेल. याची जाणीव व्हावी म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वांनी वनफेरी काढली, घोषणा दिल्या. निसर्गाचे, वनांचे सान्निद्ध्य अनुभवण्यासाठी नदीकिनारी असलेल्या जुवाड बेटाच्या निसर्गात आपण एकत्र जमलो. आपण स्वतःहून एखाद्या कुंडीत किंवा जमिनीत बियाणे घालून झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न केल्यास ते झाड आपल्याशी हितगुज करीत असल्याचे जाणवेल. यातून आपल्याला निसर्गाशी एकरूप होता येईल, ‘वृक्षरक्षक’ होता येईल, असे वाटेकर म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उक्ताड शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून वाशिष्ठी नदी किनारी असलेल्या जुवाड बेटापर्यंत ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ घोषणा देत वनफेरी काढली. बेटावर पोहोचल्यावर मुलांनी तिथल्या निसर्गाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी झाडावर चढणे, झाडावरून आंबे काढणे, दगडाने कैऱ्या पाडणे आदींचा अनुभव घेतला.

वनफेरीपूर्वी शाळेत ग्रामस्थ विनोद चिपळूणकर आणि राजेंद्र शिगवण यांच्या उपस्थितीत तीन वर्षे वयाच्या जांभूळ वृक्षाचे रोपण करण्यात आले. शाळा व विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून ऍक्टिव्ह ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष कैसर देसाई उपस्थित होते. देसाई यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सखाराम जावीर, शिक्षिका सीमा कदम, स्नेहा नेटके यांनी परिश्रम घेतले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button