मराठी पत्रकार परिषद लांजा शाखेमार्फत पत्रकार दिनी विविध उपक्रम
विलवडे मतिमंद शाळेला आर्थिक मदत
नासा भेटीसाठी निवड झालेल्या आशिष गोबरे या विद्यार्थ्याला केली आर्थिक मदत
पोंभुर्ले देवगड या ठिकाणी जाऊन बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन
लांजा : मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम विविधांगी उपक्रमांनी शुक्रवारी साजरा करण्यात आला. विलवडे येथील प्रतीक्षा या विशेष मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन आर्थिक मदत आणि खाऊवाटप करण्यात आले. त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्यात आला. याबरोबरच पोंभुर्ले येथे जाऊन आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाच्यावतीने हा दिवस शुक्रवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी विलवडे येथील मतिमंदांसाठी असलेल्या प्रतीक्षा या विशेष मतिमंद यांच्या शाळेत जाऊन येथील मुलांना आर्थिक मदत तसेच खाऊ वाटप करण्यात आले. आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्यात आला. या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक फादर ऑगस्टीन, मुख्याध्यापक अशोक कांबळी, शिक्षिका प्रीती सरफरे, संपदा क्षीरसागर, प्रतिक्षा मोहिते, सिस्टर विनिता, निर्मल आदी उपस्थित होते. यानंतर नासा आणि इस्त्रो भेटीसाठी निवड झालेल्या तालुक्यातील शिरवली शाळेच्या आशिष गोबरे या विद्यार्थ्याचा पुष्पगुच्छ आणि प्रवासाच्या तयारीसाठी आर्थिक मदत करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, कार्यक्रम अधिकारी आर.के. कांबळे, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष उमेश केसरकर, आशिषचे आई-वडील उपस्थित होते.
यानंतर मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोंभुर्ले(तालुका देवगड) येथे जाऊन आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. दिवसभरातील या विविधांगी सामाजिक उपक्रमात मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष सिराज नेवरेकर, उपाध्यक्ष रवींद्र साळवी, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश कदम, जिल्हा सदस्य संजय साळवी, तसेच तालुका पदाधिकारी संतोष कोत्रे, गोविंद चव्हाण, नसिर मुजावर आदी पत्रकार सहभागी झाले होते.