Adsense
महाराष्ट्र

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा संकल्प : ना. उदय सामंत

रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

अलिबाग : शेतकरी बांधवांचे जीवन सुसह्य होण्यास्तव राज्य शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणे, हा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.


सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2022-23 चे उद्घाटन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर,जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार विजय तळेकर, विविध शासकीय विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख, शेतकरी बांधव व सर्व संबंधित उपस्थित होते.
श्री. सामंत पुढे म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या उत्पादनास चांगली बाजापेठ मिळण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी काजू बोर्ड आणि आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळणार आहे.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. सरकारने अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही घेतले जातील.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ( CMEGP ) योजनेत समाविष्ट होणाऱ्या शहरी भागातील घटकांना २५% तर ग्रामीण भागातील घटकांना ३५% देय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध होण्याकरिता सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकासह आता राज्यातील सहकारी क्षेत्रातील १४ बँकांना प्रमुख सहयोगी संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सहकारी बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्याची व्यवस्था केल्यामुळे घटकांना जलदगतीने कर्ज मिळणे अधिक सोयीचे होणार आहे. कर्ज मिळण्यासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, यासाठी बँकांना सूचित केले असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने भात पीक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक शेतकरी बांधवांना पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
या महोत्सवात कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत. हा कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून जिल्ह्यातील हजारो शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button