Adsense
महाराष्ट्र

मांडवखरीतील महिला शेतकरी गटाला ठिबक सिंचन यंत्रणेचे हस्तांतरण


नेरोलॅक-दिशान्तरतर्फे समृद्ध ग्रामचे निर्माणकार्य!

चिपळूण : जल व्यवस्थापन आणि वातावरणीय बदलाचा विचार करून कन्साई नेरोलॅक पेंट्स लि. या कंपनीतर्फे मांडवखरी( ता. चिपळूण ) येथील काळकीदेवी महिला शेतकरी गटाला ठिबक सिंचन यंत्रणेचे हस्तांतरण करण्यात आले. शेतीतून आर्थिक उन्नतीचा अन्नपूर्णा प्रकल्प गेल्या तीन वर्षापासून येथे यशस्वीपणे राबविण्यात येत असून शेती व शेतीपूरक व्यवसायाला यातून चालना देत आत्मनिर्भर ग्राम निर्मितीचे कार्य कंपनीने दिशान्तर संस्थेच्या साथीने महिला शेतकऱ्यांना सहकार्याचा हात देत साधले आहे.


दिशान्तर संस्थेने काही गावातून अन्नपूर्णा प्रकल्प महिला शेतकऱ्यांच्या साथीने उभारले आहेत. अशाचपैकी एक पण, शेती व शेतीपूरक व्यवसायाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला म्हणून मांडवखरी येथील अन्नपूर्णा प्रकल्पाकडे पाहिले जाते. येथील काळकीदेवी महिला शेतकरी गटाला कन्साई नेरोलॅक पेंट्स लि. या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून गत तीन वर्ष सहकार्याचा हात देण्यात आला. यातून सहकारातून सामुदायिक शेती, महिलांकृत सेंद्रिय शेती व दलाल मुक्त विक्री व्यवस्था या पंचसूत्री द्वारे रब्बी व खरीप हंगामात शेती केली जाते. याशिवाय या ठिकाणी समृद्ध परसबागांचे निर्माणकार्य साधण्यात आले आहे. तसेच गटातर्फे या ठिकाणी व्यावसायिक स्तरावर अळंबी निर्मिती देखील करण्यात येते. खरीप हंगामामध्ये लाल तांदुळाचे उत्पादन हा समूह घेतो. कोविड काळात देखील प्रत्येक महिला शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक परसबागातून हजारो रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.


या सगळ्याच कामाची दखल कंपनीने घेऊन सलग चौथ्या वर्षी देखील सहकार्य या गटाला करताना जल व्यवस्थापन व जागतिक वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर येथील समूह शेतीसाठी ठिबक सिंचन ची व्यवस्था केली. याच सर्व साहित्याचे हस्तांतरण कंपनीतर्फे करण्यात आले. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील फॅक्टरीचे प्रमुख संदीप दत्त, मनुष्यबळ व्यवस्थापक नंदन सुर्वे, व्यवस्थापक विनोद कदम, सुरक्षा अधिकारी निलेश राणे, दिशान्तर संस्थेचे राजेश जोष्टे, सीमा यादव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


कंपनीने गेल्या तीन वर्षात शेतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. पॉवर टिलर, पंप, पाईप, कुंपण, परसबागेसाठी फळ झाडे, अळंबी निर्मितीसाठी प्रशिक्षण, शेती अवजारे यासह शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे अशा साऱ्याचा यात समावेश आहे. येथील महिला शेतकऱ्यांनी या साऱ्या सहकार्याच्या बळावर शेतीमध्ये दमदार वाटचाल केली आणि आज हा गट आत्मनिर्भर बनला आहे. याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो, अशी भावना मनुष्यबळ व्यवस्थापक नंदन सुर्वे यांनी व्यक्त केली. तर सामाजिक उत्तरदायित्वातून सुरू असलेले काम हे यशदायी ठरल्यानेच चौथ्या वर्षी देखील या गटाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री.दत्त यांनी स्पष्ट केले. यापुढे देखील दिशान्तर संस्था व महिला शेतकऱ्यांचा हा गट यांच्यातील ऋणानुबंध हे कायम राहतील असे सुतोवाच त्यांनी केले.


अत्यंत संवेदनशील व कर्तव्यबुद्धीने सुरु असलेल्या कंन्साई- नेरोलॅक पेंट्स लि. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी तसेच कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक संतोष देशमुख यांच्याप्रती महिला शेतकरी गट व दिशान्तर संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button