मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणासाठी आझाद मैदानावर 20 रोजी जन आक्रोश
समितीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन
मुंबई : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती पुन्हा एकदा दि. 20 मार्च रोजी आझाद मैदानावर जन आक्रोश आंदोलन करणार आहे. या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर समितीच्यावतीने अॅड. ओवेस पेचकर, समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली व रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत अधिवेशनात विषय उपस्थित करावा, अशी मागणी केली.
जन आक्रोश समितीच्यावतीने ना. अजित पवार यांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भेट घेण्यात आली. रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, या मुद्यावर विधानसभेच्या अधिवेशनात सखोल चर्चा व्हावी, यासाठी मागणी करण्यात आली.
यावेळी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये हा विषय चर्चेला घेण्यात येईल व या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल. यासाठी निवेदन देण्यात आले.
या बाबत ना. पवार यांनीदेखील तत्काळ दखल घेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जन आक्रोश समितीचे पेचकर, सह कार्याध्यक्ष अनिल काडगे, रूपेश दर्गे, अॅड. प्रथमेश रावराणे आदी उपस्थित होते.