महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट २५ एप्रिलपासून राहणार बंद!

हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले जारी

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट 25 एप्रिल 2023 ते 10 मे 2023 या कालावधीत दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असून बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतुक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत.


पनवेल-महाड-पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या परशुराम घाट मधील लांबी मधील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामापैकी 1.20 किमी लांबी ही उंच डोंगर रांगा व खोल दऱ्या असल्याकारणाने चौपदरीकरणाचे काम अवघड स्वरुपाचे आहे. या 100 मीटरमधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे असल्याने त्याठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेल्या मातीमुळे खाली कार्यरत महामार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी व पुढील संभाव्य जीवित व वित्तहानी होवू नये म्हणून या प्रकल्पासाठी नियुक्त ठेकेदार यांनी या ठिकाणी काम करण्यासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे परशुराम घाटामध्ये वाहनांची वाहतुक सुरक्षितरित्या करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करुन त्यांच्या निरीक्षणाखाली परशुराम घाट 25 एप्रिल 2023 ते 10 मे 2023 या कालावधीत दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे.


तसेच बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्याबाबतची कार्यवाही खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात येण्याबाबतही आदेशीत केले आहे.

1) परशुराम घाटातील वाहतुक दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवणे व बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्याबाबतची कार्यवाही उपविभागीय दंडाधिकारी खेड व चिपळूण, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व चिपळूण, आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग पेण-रायगड, व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे करावी.
2) परशुराम घाटात दरड प्रवणग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्निशामक वाहन, इत्यादी आवश्यक साधन -सामग्री व जबाबदार अधिकारी यांच्यासह पुरेसे मनुष्यबळ मदत व बचाव कार्यासाठी उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांची राहील.
3) रोडच्या बाजूस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक राहील.
4) परशुराम घाटातील वाहतूक कोणत्या वेळी वाहतुकीसाठी खुला अगर बंद राहणार आहे याबाबत घाटाच्या सुरुवातीस व घाटाच्या शेवटी तशा आशयाची वाहतुकीची चिन्हे व ठळकपणे दिसणारे फलक लावावेत व त्याबाबत स्थानिक भागात आणि लगतंच्या जिल्ह्यांमध्ये व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्याची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तरित्या करण्याची आहे.
5) परशुराम घाटातील वाहतुक कोणत्या वेळी वाहतुकीसाठी खुली अगर बंद राहणार आहे याबाबत पनवेल, सिंधुदुर्ग, गोवा, व कोल्हापूर या ठिकाणी व्यापक प्रसिध्दी दयावी व परशुराम घाटातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई वरुन येणारी जास्तीत जास्त वाहने, पनवेल वरुन मुंबई-पुणे महामार्गावरुन तसेच गोव्यावरुन येणारी वाहने पाली, जि. रत्नागिरी येथून रत्नागिरी -कोल्हापूर-मुंबई या मार्गे वळविण्यात यावीत, यादृष्टीने कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना करावी.
6) या आदेशात नमूद केल्याप्रमाणे कालावधी व वेळेत परशुराम घाटातील वाहनांच्या वाहतुकीबाबत सर्वतोपरी सुरक्षिततेसह सुयोग्य नियोजन करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण-रायगड व रत्नागिरी यांची संयुक्तपणे राहील.
परशुराम घाटातील वाहतूक थांबविल्यास त्या ठिकाणी थांबलेल्या वाहनधारकांकडून रोष व्यक्त होण्याची शक्यता राहते. त्यामुळे घाटात सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने दोन्ही विभागांनी किमान उप अभियंता दर्जाचे जबाबदार अधिकारी यांची नेमणूक करावी.
7) या घाटामध्ये वाहतूक बंद अगर सुरु असल्याचे कालावधीत राष्ट्रीय महामार्ग विभाग व त्यांच्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी 24 तास लक्ष ठेवणे आवश्यक राहील.
8) परशुराम घाटातील दरड प्रवण क्षेत्रामध्ये मुंबई-पुणे महामार्गावरील घाटामध्ये करण्यात आलेल्या फेन्सिंगसारखे, फेन्सिंग तात्काळ करावे.
9) घाटामध्ये संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे आवश्यक आहे.
हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असलेल्या पर्यायी मार्गावरील साईड पट्टीची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पर्यायी मार्गावरील सुरक्षित ठिकाणी जेसीबी, पोकलेन, क्रेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्निशामक वाहन इत्यादी आवश्यक साधन सामग्री व जबाबदार अधिकारी यांच्यासह पुरेसे मनुष्यबळ मदत व बचावकार्यासाठी उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांची संयुक्तपणे राहील.

बंदी कालावधीतील वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी, यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे व फलक उभारण्याची कार्यवाही कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी वाहतूक पोलीस व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मदतीने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button