महाराष्ट्र

राज्य सरकारविरोधात विरोधकांची विधानभवनच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

भूखंड घोटाळ्याप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा : नाना पटोले

नागपूर, दि. २० डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नागपुरातील १०० कोटीचा भूखंड एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना  कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातला असून न्यायालयानेही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मिनीटही खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विधिमंडळाच्या पायऱ्यावर मविआने ईडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर ताशेरे ओढलेले आहेत. एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला असताना ते पदावर कसे राहू शकतात? महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व संजय राठोड यांच्यावर आरोप होताच त्यांनी राजीनामे दिले. मग मुख्यमंत्र्यांवर एवढा गंभीर आरोप झाला असून न्यायालयानेही ताशेरे ओढले असताना ते खूर्ची का सोडत नाहीत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही विरोधी पक्षांची मागणी असून सभागृहातही आम्ही ही मागणी लावून धरू असे पटोले म्हणाले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ सदस्यांची बैठक काँग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत विधीमंडळाच्या कामकाजासंदर्भात व्यूहरचना ठरवण्यात आली तसेच सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

विधान भवनच्या पायऱ्यावर मविआच्या सदस्यांनी, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, पन्नास खोके, एकदम ओके, मुख्यमंत्री राजीनामा द्या, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा देण्यात आल्या.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button