महाराष्ट्र
Trending

रायगडावर १ व २ जूनला ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम; आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार

मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.

रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button