रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ सुविधा
नागरिकांनी शासनस्तरावर प्रलंबित कामाविषयी अर्ज, निवेदने सादर करावीत : जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर
अलिबाग,दि.22 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्यानुषंगाने मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून दिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यासाठी माहे जानेवारी 2020 पासून विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात होणारे अर्ज निवेदन इत्यादीवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
शासकीय कामांच्या अंमलबजावणीत अधिकाधिक, प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटार होण्यासाठी शासन महसूल व वन विभागाकडील दि.16 डिसेंबर 2022 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या कामाविषयी त्यांचे अर्ज, निवेदने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दाखल करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.