लांजा आठवडा बाजारात बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना मन:स्ताप
लांजा : शहरात दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. लांजा शहराचा आठवडा बाजार हा मुंबई-गोवा महामार्गावर भरत असल्याने बाजारा दिवशी रस्त्यावर वाहने आणि नागरिकांची गर्दी होते. अशातच बेशिस्त पार्किंग करून वाहने उभे केल्याने व्यापारी आणि नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.
आठवडा बाजाराकरीता बाहेरून येणारे व्यापारी हे महामार्गालगतच दुकाने लावून बसतात आणि तालुक्यातील बाजार खरेदी करायला येणारे नागरिक महामार्गावरच खरेदी करत असतात. त्यातच भरीसभर म्हणून मोकाट सुटलेली गुरे काही खायला मिळेल याच्यासाठी गर्दित घुसतात. अशातच मंगळवार २ मे रोजी आठवडा बाजारात वाहनाची ठोकर लागल्याने एका बैलाचा पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर वाहनधारक न थांबता निघून गेला. बाजारातील बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. एका मुक्या जनावराला वाहन धडक देऊन निघून गेले परंतु अशीच कुणा एखाद्या माणसाला दुखापत होईपर्यंत वाट बघायची का.? असा संतप्त सवाल नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लांजा पोलिस ठाणे मधून वाहतूक पोलीस आणि होमगार्ड उपलब्ध असतात. परंतु ते उपलब्ध असून सुद्धा योग्य नियमन होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लांजाचा आठवडा बाजारात मुंबई-गोवा महामार्गावर साधारणतः भूमिअभिलेख कार्यालयापासून ते कोर्ले फाटा पर्यंत रस्त्यालगत दुकाने तसेच नागरिकांची वर्दळ असते. त्याठिकाणी योग्य नियमन होणे गरजेचे आहे. याकरीता वाहतूक पोलीस आणि होमगार्ड यांनी एका जागेवर न थांबता बाजारपेठेत फिरून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करुन चाप बसविणे आवश्यक आहे.
दरम्यान, महामार्गावर रस्त्यालगत वाहने उभी करणे, रस्त्यावर उभारलेल्या पिलरचा जवळ वाहने उभी करणे, रस्त्याचा मधोमध एसटी बसस्थानक समोरील जागेत तासनतास वाहने उभी करणे, बाजारपेठेत पेट्रोलपंपा समोरील जागेत वेडेवाकडे पार्किंग करणे, नगरपंचायतीसमोर महामार्गावर वाहने उभी करणे अशा विविध ठिकाणी अतिशय बेशिस्त पद्धतिने वाहने पार्किंग केलेली असतात. अशा बेशिस्त वाहनांची पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.