महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची बालवयातील कला जतन करणे अभिनंदनीय!

पैसा फंड प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव

संगमेश्वर : विद्यार्थ्यांची कला त्यांच्या बालवयात जतन करणे खूप महत्वाचे असते. बालवयात मुलांच्या विचारांची झेप कल्पनाशक्ती पलीकडील असल्याने त्यांच्या अंतर्मनातून उमटणारा एखादा विषय हा भल्याभल्यांना अंतर्मुख करणारा असतो. बालकलेचे महत्व ओळखून संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा संग्रह करण्याचा उपक्रम हाती घेतला प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते २३ व्या कलासाधना चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करण्यात आले.

सन २००० साली कलासाधना हा चित्रकला वार्षिक तयार करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांच्याच संकल्पनेतून सुरु करण्यात आला. चित्रकलेतील विविध विभागांची आवड असणारे विद्यार्थी वर्षभरात ज्या कलाकृती तयार करतात त्यातील उत्तम कलाकृतींची निवड करुन कलासाधना हे चित्रकला वार्षिक तयार केले जाते. वर्षभर कला अभ्यासक्रमांतर्गत काम करीत असतांना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि या स्पर्धेतून त्यांच्या हातून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण व्हाव्यात याच बरोबर ग्रामीण भागातील हे बालकलाकार भविष्यात उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी शहरांत गेले तर , तेथील स्पर्धेत ते टीकावे किंबहुना पुढे जावेत हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे मुख्याध्यापिक सचिनदेव खामकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

कलासाधना चित्रकला वार्षिक मधील कलाकृती एवढ्या सुंदर आहेत की, त्या प्रशालेतील चिमुकल्या हातांनी रेखाटलेल्या असतील असे वाटतच नाही. प्रशालेकडे बाराशे कलाकृतींचा संग्रह होणे, ही शाळा आणि संस्थेला अभिमानाची बाब असल्याचे मत संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांनी या चित्रकला वार्षिक प्रकाशनानंतर बोलतांना व्यक्त केले . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी कलासाधना मधील चित्र आवर्जून पाहावी असे आवाहन सचिव धनंजय शेट्ये यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे, समीर शेरे, बाबा नारकर , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते.


विद्यार्थ्यांची कला ही एखाद्या तज्ञ कलाकारालाही कधीकधी अंतर्मुख व्हायला लावते . बालकलाकारांच्या अंतर्मनातील भावविश्व ते कलेतील सर्व मर्यादा नियम ओलांडून अत्यंत निरागसपणे आपल्या कलाकृतीतून दृष्य रुपात आणत असतात . प्रसंगी बालकला समजणेही अवघड जाते . यासाठी बालकलाकारांना त्यांच्या कलाकृतीत काम करतांना नियमांच्या चौकटीत बांधून न ठेवता मोकळेपणाने काम करायला दिल्यास कागदावर त्यांच्या मनातील खरे आकार आणि रंग उमटतात . यातूनच आश्चर्यकारक चित्रे तयार होतात . पैसा फंडचा कलासाधना हा उपक्रम अशा कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून यामुळेच येथील असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात आपली उल्लेखनीय प्रगती करीत आहेत .

विष्णू परीट, चित्रकार.
प्रशालेत ध्वजारोहण करताना संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये आणि मान्यवर.
कलासाधना या बालकलाकारांच्या चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करतांना संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, संस्था सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे , सदस्य संदीप सुर्वे ,रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर दिसत आहेत
प्रजासत्ताकदिनानिमित्त लेझीम नृत्य सादर करताना प्रशालेच्या विद्यार्थीनी. (छाया : मिनार झगडे)

प्रारंभी संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . यानंतर विद्यार्थ्यांनी शानदार पंचरंगी कवायत सादर केली . नववीच्या विद्यार्थींनींनी नऊवारी साडी नेसून सादर केलेले लेझीम नृत्य पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले . टाळ्यांच्या गजरात उपस्थित मान्यवरांनी लेझीम नृत्य सादर करणाऱ्या मुलींचे कौतुक केले.

यावेळी शासकीय रेखाकला परीक्षेत यश मिळविलेल्या तसेच जिल्हा कलाध्यापक संघ आणि जिंदल फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. याबरोबरच प्रशालेतील क्रिडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले. क्रिडा शिक्षक नवनाथ खोचरे , किशोर नलावडे यांनी लेझीम नृत्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी केले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button