शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ग्रोथ इंजिन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिक्षक भवनासाठी जागा उपलब्ध करण्याचे मुख्यमंत्र्यांचे राज्यस्तरीय मेळाव्यात आश्वासन
रत्नागिरी : शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ग्रोथ इंजिनच आहे. जिथे कोणीही पोहोचत नाही तिथे शिक्षक पोहोचतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांचे कौतुक. आई-वडिलांनंतर शिक्षकांचेच आदरस्थान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील चंपक मैदानात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व मेळाव्यात बोलताना केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ना. राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
रत्नागिरीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,
मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थीआहे. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप बदल झाला आहे.
तंत्रज्ञान कितीही वाढले तरी शिक्षक- विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही, शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
शिक्षक भवनासाठी निश्चित जागा दिली जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.