शिर्डीत २४ मार्चपासून भरणार राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शन!
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने “महापशुधन एक्स्पो-2023” चे आयोजन ; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा
अलिबाग, (जिमाका): शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि.24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये देशातील विविध प्रकार व जातीची तसेच अतिशय दुर्मिळ प्रकारची जनावरे पाहण्याची संधी पशुप्रेमींना व पशुपालकांना उपलब्ध होणार आहे.
याबरोबरच आधुनिक दुग्ध तंत्रज्ञान, चारा पिके व पद्धती फायदेशीर शेळीपालन, कुक्कुट पालन (मांसल/परसातील/अंडी घालणारी) व पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य व रोजगार निर्मितीच्या संधी आणि लिंग विनिश्चित रेतमात्रा (ET/IVF), भविष्यातील आव्हाने, अशा विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या महापशुधन एक्स्पो- 2023 ला भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. रत्नाकर काळे यांनी केले आहे.