शेतकर्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : दरवर्षी भारतामध्ये २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन संपूर्ण जगाच्या भूकेसाठी राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २५ डिसेंबर २०२२ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते.
आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी उदयनगर- लष्करवाडी- फणसाचे वाकण- चैतन्य नगर- अश्विनी अॅग्रो फार्म्स- इच्छापूर्ती गणेश मंदिर- आझाद मैदान अशा ५ किमी मार्गावर झाली. मातीतून सोने उगवणाऱ्या शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत या मार्गावरील काही शेतकरी बांधवांचा गौरव करण्यात आला, त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच वेलकम नर्सरी, अश्विनी अॅग्रो फार्म्स येथे श्री प्रभाकर शिंदे सर आणि परिवार यांनी शेतीतील वेगवेगळी पिके, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, मसाला पिके, शेतीच्या पद्धती, झाडांबद्दल परिपूर्ण माहिती सांगितली. अनेकांनी याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारुन अधिक माहिती जाणून घेतली. ज्ञानात भर पडल्यामुळे सर्वजण खुश होते. अन्नाचे महत्त्व, ते तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, मेहनत, कष्ट याबद्दल अधिक समजले. ताटातील अन्न वाया न घालवण्याचा प्रण सर्वांनी केला.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, सुरज शेठ, आमोद बुटाला, सर्वेश बागकर, रोहन कदम, सुधिर चव्हाण, संजय पिंगळे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.