महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल टाकू नये : नाना पटोले

महाविकास आघाडीची दुसरी वज्मूठ सभा नागपूरमध्ये संपन्न

नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट झाली, शेतकरी ढसाढसा रडतोय त्याला मदत देत नाही पण जाहीरातींवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकारच्या चुकीच्या धोणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहापटिने वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल टाकू नये, असे आवाहन करत आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करून त्यांची जागा दाखवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा नागपूरमध्ये पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री सुनिल केदार, विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी नेते उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, नागपूर हे देशातील सर्वात महागडे शहर आहे, या शहरात जे काही आणले जात आहे ते कर्जाने आणले आहे व नागपूरच्या लोकांना लुटले जात आहे. विकासाच्या नावाखाली लुटण्याचे काम सुरु आहे. ऑऊट सोर्सिंगच्या माध्यमातून सरकारी नोकर भरती करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन असते पण ऑऊट सोर्सिंगमुळे जनतेला न्याय मिळणार नाही. पुलवामा स्फोटात वापरलेली स्पोटके नागपूरमधून गेली पण त्याचा छडा अद्याप लावला जात नाही. शेतकरी, तरुण, व्यापारी यांना बरबाद करण्याचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. नागपूर हा भाजपा बालेकिल्ला नाही तर डॉ. बाबासाहेबांची दिक्षाभुमी आणि ताजुद्दीन बाबांची भूमी आहे. राजकीय स्तरावर विचार केला तर भाजपाचा नागपूर भागातून काँग्रेसने सुपडा साफ केला आहे.

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेवर बसलेल्या लोकांच्या मित्रांच्या फायद्यासाठी लोकशाहीचा वापर केला जात आहे. यांच्या मित्रांचे नंबर श्रीमंतीत वर जात आहे तर जनतेचा नंबर मात्र खाली खाली जात आहे.लोकशाहीच्या मार्गाने देश चालण्यासाठी ज्या माणसाने संविधान दिले त्याचे रक्षण आम्ही करु शकत नाही का? घटना बचाव नाही तर घटनेचे रक्षण मीच करणार अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत. राज्यातील सरकार हे अवकाळी सरकार आहे. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली आता मात्र पंचानाम्याचे करत बसले आहेत.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button