संगमेश्वरच्या स्विटी कांबळेची महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीगसाठी निवड
संगमेश्वर ( प्रतिनिधी ): संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावची आणि पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरची विद्यार्थीनी असलेल्या स्विटी सुधाकर कांबळे या विद्यार्थीनीची कोल्हापूर येथे झालेल्या क्रिकेट निवड स्पर्धेतून महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीगसाठी निवड झाली आहे. स्विटीच्या या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
स्विटी सुधाकर कांबळे हिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने सुरुवातीला रबरी, नंतर टेनिस चेंडूवर खेळणारी स्विटी हळूहळू सिझन बॉलवर सराव करु लागली. प्रकृतीने नाजूक असूनही काटक असणाऱ्या स्विटीने अल्पावधीतच सिझन बॉल सरावाने स्वतःचा वेगळा ठसा रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट जगतात उमटवला. अनेकदा सिझन बॉलवर सराव करताना अंगाला जखमा होवूनही स्विटी कधीही मागे हटली नाही. पालकांच्या आणि क्रिडा शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रेरणेमुळे तिने सतत सरावावर दिलेला भर तिला जिल्हास्तरावर नेहमीच यश देत आला.
स्विटीचे वडील सुधाकर कांबळे यांनी तिला क्रिकेटमध्ये करीयर करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आणि सिझन बॉल सरावासाठी आवश्यक सर्व साहित्य वेळच्यावेळी उपलब्ध करुन दिल्याने स्विटीमधील आत्मविश्वास वाढत गेला.जिल्हास्तरावर विविध स्पर्धात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारी स्विटी अष्टपैलू महिला क्रिकेटर आहे . आपल्या वडिलांच्या आणि प्रशिक्षकांच्या पाठबळामुळे आपण क्रिकेटमध्येच आपले करियर करणार असल्याचे स्विटीने या निवडीनंतर बोलताना नमूद केले. नियमित सराव आणि व्यायाम तसेच नेमून दिलेला आहार यामुळे आपण कायमच तंदुरुस्त असल्याचा मला आनंद आहे असेही तिने स्पष्ट केले . ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात तेथे वडील आपल्याला घेऊन जात असल्याने माझ्यातील आत्मविश्वास वाढत गेला आणि आता आपली महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीगसाठी निवड होवू शकली असे स्विटीने नमूद केले.
स्विटी सुधाकर कांबळे ही व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये नववी सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहे . दररोज तुरळ येथून शाळेत येत शालेय अभ्यास , सराव करत तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे व्यापारी पैसा फंड शिक्षण संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर शेट्ये , सचिव धनंजय शेट्ये , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे , क्रिडाशिक्षक नवनाथ खोचरे, किशोर नलावडे आदिंनी अभिनंदन केले आहे.