सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली : केशव उपाध्ये
मुंबई : सत्तेची संधी दिसल्यामुळे एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी ही केवळ गाजराची पुंगी होती हे आता स्पष्ट झाले आहे. सत्ता जाताच या आघाडीची बिघाडी झाली असून एकत्र राहिल्यास तीन तिघाडा काम बिघाडा होईल याची त्यांना खात्री असल्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याचे दिसू लागले आहे. महाविकास आघाडी म्हणून सत्ता राबवितानाही एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या नेत्यांना आता आपापल्या पक्षाचा बचाव कसा करायचा या चिंतेने ग्रासले असून ही आघाडी म्हणजे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण होते, अशी खरमरीत टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके , शिवानंद हैबतपुरे यावेळी उपस्थित होते.
भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सत्ता गेल्यानंतरही एकत्र राहण्याच्या गर्जना करणारे महाविकास आघाडीतील तीन पक्ष विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतही एकत्र राहू शकत नाहीत, यावरूनच त्यांच्या ऐक्याच्या गर्जना केवळ पोकळ होत्या हे उघड झाले आहे. बंडखोरी, नाराजी आणि फुटीने ग्रासलेल्या काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. पक्षातील नाराजीमुळे काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे, तर राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे