सलोखा योजने अंतर्गत कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हयात पहिले प्रकरण निर्णीत
रत्नागिरी : मुख्य़मंत्री व मा.महसूल मंत्री यांच्या संकल्प़नेतून “ सलोखा योजनेबाबत ” महाराष्ट़ शासन, महसूल व वनविभागाकडील शासन निर्णय क्रमांक.मुद्रांक-2022/प्र.क्र.93/म.1 (धोरण), दि. 03 जानेवारी, 2023 मधील तरतूदीनुसार एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्यांकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा नांवावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क़ नाममात्र रु.1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे.
दिनांक 22 व 23 फेब्रवारी 2023 रोजी लोणी, जि.अहमदनगर येथे झालेल्या महसूल परिषदेनंतर मा.ना.श्री.उदय सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांनी रत्नागिरी जिल्हयाची आढावा बैठक घेवून रत्नागिरी जिल्हयामध्ये “सलोखा योजना ” प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना संबोधित केले होते.
सदरचे योजनेअंतर्गत मौजे राजवेल, ता.खेड, जि.रत्नागिरी येथील गट नंबर 36, क्षेत्र 0-12-0 हे.आर, आकार 0-06 ही शेतजमीन 1) श्री.अब्बास अ.रहिमान हमदुले, 2) श्री.महमद हनिफ अ.रहिमान हमदुले व 3) श्री.मुश्ताक अ.रहिमान हमदुले यांचे सामाईक नांवे दाखल असून, सदरची शेतजमीन श्री.महामुद म.हुसेन हमदुले हे गेली 17 वर्षे वहिवाट व कसत आहेत. तसेच सदरचे गांवामधील गट नंबर 79, क्षेत्र 0-24-0 हे.आर, आकार 0-13 ही शेतजमीन श्री.महामुद म.हुसेन हमदुले यांचे नांवे दाखल असून, सदरची शेतजमीन 1) श्री.अब्बास अ.रहिमान हमदुले, 2) श्री.महमद हनिफ अ.रहिमान हमदुले व 3) श्री.मुश्ताक अ.रहिमान हमदुले हे गेली 17 वर्षे वहिवाट व कसत आहेत.
मा.डॉ.महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोकण विभाग आणि श्री.एम.देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात एक शिबीर घेण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच २१ प्रस्ताव सादर केले असून आज श्रीम.राजश्री मोरे, उपविभागीय अधिकारी, खेड व श्रीम.प्राजक्ता घोरपडे, तहसीलदार, खेड यांनी खेड तालुक्यात “ सलोखा योजनेअंतर्गत ” जिल्हयातील पहिले प्रकरण निर्णीत करुन शेतकऱ्याला जमिनीचा हक्क मिळवून दिलेला आहे.
डॉ.महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी या कामासाठी विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे कौतुक केले आहे.