महाराष्ट्र

सुरेश वामन सप्रे : एक अजब रसायन!

अटलजी पंतप्रधान होते त्यावेळची गोष्ट. संसदेवर हल्ला होऊन आठवडा झाला असावा. तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यात आम्ही दिल्लीला गेलो होतो. अटलजीना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या सरकारी निवासस्थानी जमलो होतो. अटलजीना भेटून त्यांच्याशी छान गप्पा मारुन आम्ही निघणार एवढ्यात आमच्यातील एका अवलीयाला काय झाले कुणास ठाऊक….? अटलजींच्या भोवतालच्या सुरक्षा कड्याला भेदून ‘तो ‘ अटलजीना काही तरी सांगू लागला… अटलजीही “त्याच्या” शी आपलेपणाने बोलत होते. आम्ही सर्वजण हा प्रकार पाहून अक्षरशः थक्क झालो. तब्बल १० मिनिटे ‘हा’ आमच्यातील एकजण देशाच्या पंतप्रधानांशी गप्पा मारतोय….जशी काही त्यांची जुनी ओळख असावी.
हे अजब रसायन म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून नुकताच ज्याला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार देवुन गौरवण्यात आले तो सुरेश वामन सप्रे!


केवळ देवरुखमधल्या नव्हे तर संपूर्ण कोकणच्या राजकीय स्थितीची विद्यमान आमदार; खासदारांना जेवढी जाण नसेल तेवढी एकट्या सुरेशला आहे. तोंडाने फटकळ तरी मैत्रीसाठी सदैव हात पुढे असणारा हा अवलिया सद्यस्थितीत राजकारणापासून थोडासा दूर असला तरीही एकेकाळी कोण काय निर्णय घेईल, हे हा माणूस घरी बसून सांगायचा. अनेक बड्या बड्या नेत्यांशी थेट संबंध असतानाही स्वतःचा अजिबात फायदा न करुन घेणारा सुरेश अजूनही विकास कामांसाठी आग्रही असतो. त्याच्याबरोबर भरपूर फिरणे झाल्याने त्याचे अनेक किस्से खर तर लिहिता येतील, पण त्यापेक्षा त्याने आपल्या पत्रकारितेचा वापर केवळ वृत्तपत्रात लिहिण्याकरिता किंवा नाव, पैसा कमावण्यासाठी केला नाही हे महत्वाचे म्हणूनच रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाने त्याला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पुरस्कार देवून त्याचा गौरव केला. – समीर सप्रे, पनवेल.

मी सर्वांना आधिच सांगितले होते की, अटलजींशी दोन मिनिटे तरी बोलून दाखविणार. तेव्हा सर्वांनी मला मुर्खात काढले होते. पण, मी काका हाक मारून त्यांचेशी चक्क १० मिनिट मराठी तून बोललो. मला खात्री होती ते बोलणारच. कारण माझे एक नातेवाईक अनंत जोशी हे त्यांचे संघापासूनचे सहकारी होते.. ते दिल्लीत आलेपासून त्यांचे एकत्रच काम करत व राहायला त्यांचेकडे असत. ते नंतर वृद्धझालेने दिल्ली सोडून ते देवरूखात आले. ते पंतप्रधान झालेवर त्यांनी त्यांना पत्र लिहले व दिल्लीत बोलवून घेतले. आठ दिवस ते राहीले र परत देवरूखात आले. त्यानंतर १५ दिवसांनी त्यांचे निधन झाले व १५ दिवसांनीच आम्ही दिल्लीत गेलो. या सर्व गोष्टी व त्यांची मैत्री मला माहित असल्याने मी ठरवलेच की, भेट झाली की तअटलजींशी बोलून ओळख सांगून चर्चा होणारच ही खात्री होती व तसेच झाले व सर्व वृत्तांत सांगितला. ते लगेच गहिवरले. हा किस्सा मी प्रथमच त्यांचे श्रध्दांजली वाहण्यात आली तेव्हा सांगितला.

सुरेश सप्रे, देवरुख.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button