आदर्श शिक्षिका शर्मिला गावंड यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड
नॅशनल इनोव्हेटिव्ह अवॉर्डने होणार सन्मान!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : स्टेट इनोव्हेशन रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) महाराष्ट्र तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२३ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे, तालुका उरण जिल्हा रायगड येथील उपक्रमशील शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांच्या नवोपक्रमाची निवड झाली असून त्यांना नॅशनल इनोव्हेटिव्ह अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे.
शिक्षकांनी आपल्या अध्यापनात नाविन्यता आणून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे काळानुसार गरजेचे आहे हेच नवोपक्रम इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरतात .या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून नवोपक्रम सादर करण्यात आले या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रमशील शिक्षकांनी भाग घेतला. यात रायगड जिल्ह्यातून प्राथमिक विभागातून शर्मिला महेंद्र गावंड यांच्या “व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनास प्रेरणा” या उपक्रमाची निवड करण्यात आली. त्यांना राष्ट्रीय स्तरावरील समारंभात नॅशनल इनोव्हेटिव्ह अवार्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
या आधी शर्मिला गावंड यांना या वर्षी शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल उरण द्रोणागिरी भूषण पुरस्कार, जिल्हा शिक्षक रत्न , ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून सर फाऊंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय नारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम मशाळे, बाळासाहेब वाघ, महिला समन्वयक श्रीमती हेमा वाघ, आयटी विभाग प्रमुख राजकिरण चव्हाण तसेच उरण तालुक्यातून सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.