कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाबाबत खा. रवींद्र वायकर यांनी उठवला आवाज
नवी दिल्ली : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावे, या कोकणवासियांच्या दीर्घकाळाच्या मागणी संदर्भात मुंबईतील खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी लोकसभेतील चर्चेत भाग घेताना प्रश्न उपस्थित केला.
वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकर यांनी आज दि. ४ डिसेंबर, २०२४ लोकसभेत रेल्वे संदर्भातील चर्चेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण या विषयी प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात या विषयाला गती मिळणार असल्याबाबत शुभचिन्हे दिसू लागली आहेत.
खासदार रवींद्र वायकर यांनी हा प्रश्न संसदीय चर्चेत भाग घेताना उपस्थित केल्याने या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कोकण विकास समितीचे सदस्य तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघांचे सचिव अक्षय महापदी यांनी आभार मानले आहेत.