चाफवली शाळेतील समीक्षा बोडेकरची इस्त्रो व नासाच्या भेटीसाठी निवड

नाणीज : इस्त्रो/नासा गगनभरारी उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेत चाफवली (ता. संगमेश्वर) प्राथमिक शाळा नं. १ ची सतवितील विद्यार्थिनी कु. समीक्षा सुरेश बोडेकर हिने उत्तुंग गगनभरारी घेतली आहे. तिची इस्रो व नासाच्या भेटीसाठी निवड झाली आहे
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे गगनभरारी उपक्रमांतर्गत मुलांमध्ये विज्ञानाची गोडी लागावी म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यातून वेगवेगळ्या चाचण्या, मुलाखती घेऊन ही निवड करण्यात येते. त्यांना इस्रो व नसाचे काम कसे चालते याची माहिती दिली जाते. सहा सात दिवसांचा हा दौरा असतो. संगमेश्वर ताुक्यातील सात विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

समीक्षा अत्यंत गरीब परिस्थितीतील घराण्यातील आहे. या मुलीने वडिलांचे छत्र हरवलेले असताना शिक्षकांच्या मदतीने खूप मेहनत करून हे देदीप्यमान यश खेचून आणले आहे. शाळेला जायला धड रस्ताही नाही.
या यशासाठी तिला मुख्याध्यापक गजानन मोघे, शिक्षिका संगीता मगदुम, सौ. वर्षाराणी कदम, नीलम सोलापुरे या सर्वांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे .त्याचप्रमाणे देवळेचे केंद्रप्रमुख संतोष बोडेकर , प्रभागाचे विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली आहे. समीक्षाला उस्फूर्त व अचूक मार्गदर्शन करणारे वैभव थरवळ, देवळे हायस्कूलचे विनोद सरदेसाई, राजेंद्र मावळणकर, अजय सूर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या सर्वोत्कृष्ट यशाबद्दल चाफवली नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा व सर्व सदस्य, तसेच माजी शिक्षण व अर्थसभापती विलास चाळके, चाफवली गावचे ग्रामस्थ, सर्व पालक वर्ग यांनी तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे.
दोन वर्षांपूर्वी याच शाळेतला नितीन बोडेकर हा विद्यार्थी देखील नासाला जाऊन आला आहे.