मुंबई-गोवा महामार्ग कामासंदर्भात मंत्रालयात आज महत्वपूर्ण बैठक
जन आक्रोश समितीच्या इशाऱ्यानंतर शासनाला जाग
सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. विनायक राऊत, आ. साळवी आदींची उपस्थिती
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या घडलेल्या कामासंदर्भात त्यांना आक्रोश समितीने मुंबईत 20 मार्चला आझाद मैदानावर आंदोलनाचे हाक दिल्यानंतर राज्य शासनाने येथे तातडीने दाखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सकाळी जन आक्रोश समिती शिष्टमंडळासह कोकणातील लोकप्रतिनिधींची महत्वाची बैठक बोलावली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामासंदर्भात ठिकठिकाणी संबंधित ठेकेदार कंपन्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहे. चौपदरीकरणणाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी काका कदम यांच्या नेतृत्वाखालील जन आक्रोश समिती देखील आक्रमक झाली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जनअक्रोश समितीने दिनांक 20 मार्च 2023 रोजी मुंबईत आझाद मैदानावर जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सकाळी मंत्रालयात तातडीने बैठक बोलावली आहे. जन आक्रोश समितीचे प्रमुख काका कदम यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार आदिती तटकरे या कोकणातील लोकप्रतिनिधींना या महत्वपूर्ण बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे.
कोकणवासीयांच्या दृष्टीने महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण संदर्भात या बैठकीत ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.