शेकडो कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे मांडल्या व्यथा

- जेएनपीटीचे शेकडो कामगार महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वासाठी आग्रही
उरण (विठ्ठल ममताबादे ) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना आज जेएनपीटीच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी बोलावून घेतले होते, त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या.
यावेळी २५-३० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार म्हणाले, “आम्ही अनेकांच्या नेतृत्वाखाली काम केले, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे महेंद्रशेठ तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, तुम्हीच आमचे नेतृत्व करा, आम्ही आपल्यासोबत आहोत.”
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “जेएनपीटीच्या कंत्राटी कामगारांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही.२५-३० वर्षे काम करणारे कामगारांना जर तुटपुंज्या पगारात काम करावे लागतेय, ही शोकांतिका आहे. भूमिपुत्रांच्या जमिनीवर जेएनपीटी उभी आहे, त्यामुळे येथील भूमिपुत्र कामगारांवरील अन्याय मी कदापि सहन करणार नाही. जेएनपीटीची उलाढाल कोट्यवधींची आहे. जेएनपीटी प्रशासन हजारो कोटींचा निधी नको तिथे खर्च करते. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणारे कामगार जर वेळेत पगार न झाल्याने वा अत्यल्प पगारामुळे उपाशीपोटी राहत असतील, तर तो गंभीर गुन्हा आहे. याचा जाब जेएनपीटी प्रशासनाला विचारू,
असा अन्याय सहन करणारे आम्ही पळपुटे नाहीत. कंत्राटी कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी मी खंबीर आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे प्रश्न मांडताना सडेतोड भूमिका मांडतो. त्यामुळे जेएनपीटीतील कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल.”
यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.