संगमेश्वरातील राष्ट्रीय महामार्ग कामाकडे लक्ष न दिल्यास जनआंदोलन : मिलिंद चव्हाण
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात प्रेस क्लबचा इशारा
संगमेश्वर (सचिन यादव) : सध्या आरवली ते तळेकांटे दरम्यान मुबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र या कामात अनेक त्रुटी असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. हे कामही निकृषष्ट असल्याचे बोलले जात आहे. नवीन रस्ता अनेक ठिकाणी खचला असून रस्त्याला लेव्हलही नसल्याचे दिसून येते. काम सुरू असताना वाहतुकीसाठी ठेवण्यात आलेले पर्यायी मार्ग हे सुस्थितीत ठेवणे ठेकेदाराचे काम असताना मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून प्रवास करताना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे तातडीने लक्ष घालून हे मार्ग दुरुस्त न झाल्यास रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा संगमेश्वर तालुका प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे.
मुबई गोवा महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. यात काम सुरू असताना पाणी न मारल्याने होणारा धुळीचा त्रास, त्यामुळे अनेक प्रवासी वर्गाला आजाराला सामोरं जावं लागतं आहे, सुरक्षा उपाययोजनांची वानवा, निकृष्ठ काम अशा अनेक तक्रारीवरून महामार्ग ठेकेदार कायमच चर्चेत असल्याचे पहायला मिळते .याविरोधात जनआक्रोश समितीच्या वतीने संगमेश्वर येथे आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येते.
महामार्गाचे काम सुरू असताना पर्यायी वाहतुकीसाठी जे मार्ग बनविले जातात ते सुस्थितीत बनवणे ही ठेकेदारांची जबाबदारी असताना असे होताना दिसत कां नाही ? आरवली ते तळेकांटे प्रवास करताना जवळ जवळ सर्वच पर्यायी मार्गाची दुरावस्था झाली आहे .या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना फार मोठा त्रास व नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे अनेकवेळा लहान मोठे अपघातही घडून येत आहेत. मात्र याकडे ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून चालढकल करत असल्याचे बोलले जात आहे.
या कामाची तत्काळ दुरुस्ती व डांबरीकरण करून हे मार्ग प्रवासासाठी सुकर बनवावा अन्यथा लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संगमेश्वर तालुका प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे.