चिपळूण शहरावर आता सीसीटीव्हीची नजर!
सहा प्रमुख ठिकाणी बसवले २५ सीसीटीव्ही कॅमेरे
चिपळूण : नगर परिषदेने शहरातील महत्वाच्या ६ ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे शहर आता सीसीटीव्हीच्या नजरकैदेत आले असून सध्या कॅमेर्यांचे कंट्रोलिंग पोलीस स्थानकातून ठेवण्यात आले आहे. अजूनही कोणत्या भागात कॅमेरे बसवण्याची गरज आहे का याचेही सर्व्हेक्षण केले जात आहे.
शहराची वाढती लोकसंख्या, त्यात वाढणारे विविध प्रकारचे गुन्हे याचा विचार करता या गुन्ह्यांची तातडीने उकल करण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज होती. त्यासाठी अनेक वर्षापासून पोलीस स्थानकाकडून सातत्याने नगर परिषदेकडे पत्रव्यवहार केला जात होता. मात्र कॅमेरे बसवण्यात अडचणी येत होत्या.
मात्र मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पोलिसांच्या मागणीला नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हिरवा कंदिल दाखवल. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या बहाद्दूरशेखनाका, पॉवर हाऊस, नगर परिषद, भेंडीनाका, चिंचनाका, बाजारपूल या ६ ठिकाणी सुमारे २५ कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे आता कार्यान्वित झाले आहेत. याचा जास्त फायदा पोलिसांना असल्याने सध्या याचे कंट्रोलिंग पोलीस स्थानकात ठेवण्यात आले आहे.