रत्नागिरीतील प्रसिद्ध वडेवाले हरिभाऊ नरवणे यांचे निधन
रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध वडेवाले हरिश्चंद्र महादेव उर्फ हरिभाऊ नरवणे यांचे मंगळवार दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री 10.15 वा.च्या सुमारास निधन झाले. निधनावेळी त्यांचे वय 86 वर्षे होते. अत्यंत प्रामाणिक, शांत व परोपकारी वृत्तीचे असलेले हरिभाऊ अनेकांचे आधारवड होते.
त्यांच्या स्वभावाप्रमाणेच “हरिभाऊंचा वडा”ही तितकाच प्रसिद्ध होता. 1966 साली भगवती बंदर येथील जेट्टीचे काम सुरू असताना तिथे काम करणाऱ्या कामगारांना खाण्या-पिण्याची सोय जवळपास उपलब्ध नव्हती. हीच गरज ओळखून हरिभाऊंनी त्याकाळी तेथील कामगारांना चहा, वडापाव उपलब्ध करून दिला आणि पुढे हाच त्यांच्या व्यवसायाचा भाग बनला. जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळपास 2 वर्षे तिथे व्यवसाय केल्यानन्तर राधाकृष्ण टॉकीज येथील कॅन्टीन त्यांनी भाडे तत्वावर चालवायला घेतले. सुमारे 30-32 वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला आणि तो नावारूपासही आणला. कुटुंबाची जबाबदारी पाहता त्याकाळी आलेली शिक्षकी पेशासारखी नोकरीही नाकारून हरिभाऊनी व्यवसायाला प्राधान्य दिले। यामध्ये त्यांना पत्नीचीही खंबीर साथ मिळाली.
गेले काही दिवस वार्धक्यामुळे ते आजारीच होते आणि त्यातच त्यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 5 मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.