उरण महाविद्यालयात संविधान जागर कार्यशाळा

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय संविधान जागर अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षापूर्वी निमित्ताने विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन केले गेले. या कार्यशाळेत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला गेला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे निश्चय साक्षात साधना हे होते. त्यांनी भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक न्याय, बंधुता, समाजवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,विश्वास, संधीची व दर्जाची समानता, सामाजिक न्याय इत्यादी विषयावर सविस्तर मांडणी केली व विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासाचे महत्त्व सांगितले. यावेळी सत्यवान ठाकूर यांनीही संविधानिक मूल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे हे होते. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रनिष्ठा प्रत्येक नागरिकांनी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे व जात धर्माच्या बाहेर लोकशाही मार्गाने प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व उपस्थितांचे आभार जेष्ठ प्रा. डॉ.व्हि.एस. इंदुलकर यांनी व्यक्त केले. खऱ्या अर्थाने संविधानीक मूल्य आज समजली अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केले . कार्यक्रमात व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न- उत्तराच्या माध्यमातून वर्तमान स्थिती व संविधान याविषयी मनातील शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.दत्ता हिंगमिरे यांनी केले.
कार्यशाळेत वसंत मोहिते, रमेश गोंधळी, डॉ. पराग कारुळकर, डॉ. हनुमंत जगताप, प्रा. रियाज पठाण इत्यादी मान्यवर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





