Infigo Eye Care : संधीत उत्तम होण्यासाठी जिद्द व टिकून राहण्याची आवश्यकता : डॉ. श्रीधर ठाकूर
श्री सोमेश्वर फंड संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा
रत्नागिरी : आपण केलेल्या सर्वोत्कृष्ट कामाची पोचपावती म्हणूनच आपल्याला बक्षीस मिळतात. जो मेहनत करेल, स्पर्धेत भाग घेईल त्याचे मोठेपण आणि कौतुक समाजात होत राहील. मोठेपणा हा छोट्या छोट्या गोष्टीतून लपलेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रयत्नात जिद्द ठेवून टिकून राहण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सोमेश्वर येथे विद्यार्थ्यांना केले.
श्री सोमेश्वर फंड संस्था सोमेश्वर या संस्थेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी पार पडला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सोमेश्वर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, जे टिकतात तेच विकले जातात. इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आयुष्यात प्रत्येकाला संधी मिळते फक्त त्या संधीत उत्तम होणे गरजेचे आहे. त्यासाठी अखंड मेहनत घेतली पाहिजे असे डॉ. ठाकूर याप्रसंगी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर फंड संस्थेचे अध्यक्ष सुहास चव्हाण हे होते. तर व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश सोहोनी, सोमेश्वर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षदा निवेंडकर, नागवेकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू सागवेकर , चिंचखरी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी तेंडुलकर, मीनाक्षी केळकर, मानसी तावडे, राजेश हरचिरकर हे होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील भारतीय सैन्यदलातून आपले देशसेवेचे कर्तव्य बजावून यावर्षी निवृत्त झालेले माजी सैनिक मिलिंद नागवेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. तर जिल्ह्यातील विविध गणेश सजावट स्पर्धेत विजेता ठरलेल्या गावातील हरहुन्नरी कलाकार मयूर भितळे याचाही गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात सोमेश्वर मराठी शाळा, नागवेकरवाडी शाळा, चिंचखरी शाळा या गावातील प्राथमिक शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. यासोबतच शाळेतील सहशैक्षणिक उपक्रम व स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या आणि सोमेश्वर फंड संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रलेखन व कविता लेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तर मान्यवरांचाही भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दहा हजार रुपयांची तर नगरपरिषद शिक्षण मंडळ सदस्य राजेंद्र पटवर्धन यांनी एक हजार रुपयांची देणगी दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सोमेश्वर फंड संस्थचे सचिव राजेंद्र कदम, दत्तात्रय सोहोनी यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक सुधीर जाधव, तर आभार संदीप चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवर्ग सर्व पदाधिकारी व सभासद यांनी मेहनत घेतली.