देशातील पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा उद्या समारोप
५७० किलोमीटर पायी प्रवास करून उद्या चैत्यभुमीवर बौद्ध धम्म पदयात्रेचा भव्य समारोप
मुंबई : आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघ थायलंड येथील ११० भिक्खूंचा सहभाग असलेली तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थीधातु कलश घेऊन परभणी ते चैत्यभुमी अशी निघालेल्या देशातील पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा उद्या लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत दादर, चैत्यभूमी येथे समारोप होणार आहे. ही पदयात्रा ५७० किलोमीटर पायी चालत उद्या चैत्यभुमीवर पोचणार आहे.
शांती आणि समतेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सिने अभिनेते तथा धम्मदूत गगन मलिक यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी ते चैत्यभूमी अशा देशातील पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १७ जानेवारी २०२३ रोजी परभणी हुन थायलंड येथील ११० बौद्ध भिक्खु यांच्यासह तथागत गौतम बौद्ध यांचा अस्थीधातु कलश घेऊन हि यात्रा परभणी-जालना-औरंगाबाद-नाशिक-कल्याण, ठाणे मार्गे दादर, चैत्यभुमी असा एकुण ५७० किलोमीटरचा पायी प्रवास करून उद्या पोचणार आहे. या ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
उद्या सकाळी ही यात्रा घाटकोपर येथून सुरु होऊन कामराज नगर-पंचशील नगर-चेंबूर,कुर्ला-आणभाऊ साठे उद्यान-सुमन नगर-सायन-माटुंगा सर्कल-दादर सर्कल-दादर प्लाझा-शिवाजी पार्क मार्गे दादर चैत्यभूमीवर सकाळी ११ वाजता पोचणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चैत्यभूमीवर या धम्म पदयात्रेचा समारोप होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सिने अभिनेते तथा धम्मदूत गगन मलिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.