विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती चालणार नाही

- शिवसेनेने ठणकावले; आता सर्व मराठी माणसाला एकत्र येण्याची वेळ आली आहे
उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे ) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उरण तालुक्यात ठोस भूमिका घेतली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार विजय घरत व उरण शहर संघटक संदीप जाधव यांच्या पुढाकारातून तालुक्यातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना अधिकृत निवेदन देऊन इशारा देण्यात आला की, “जर विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती केली गेली, तर शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल.”
शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, शाळांनी विद्यार्थ्यांवर कोणतीही भाषा सक्तीने लादू नये. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या मातृभाषा, प्रादेशिक भाषा किंवा अन्य भाषांमध्ये तिसरी भाषा निवडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. हिंदी लादण्याचा कोणताही प्रयत्न घटनाविरोधी असून, अशा प्रयत्नांचा शिवसेना ठोस विरोध करेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
ओमकार घरत यांनी म्हटले की, “आज आम्ही निवेदन सादर केले आहे. पण जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर उरणमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल. हा लढा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. आता वेळ आली आहे — सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावं, पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा उंच फडकवायचा आहे!”
हे निवेदन खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले असून, त्यांच्या स्पष्ट सूचनेनुसार जिल्हास्तरावर शिवसेनेने तात्काळ पावले उचलली आहेत.
या निवेदनास शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे.मनोहरशेठ भोईर – माजी आमदार व जिल्हा प्रमुख रायगड,शशिकांत डोंगरे – जिल्हा संघटक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष,सुनील पाटील – उपजिल्हा प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष,नरेश राहाळकर – उपजिल्हा प्रमुख रायगड,संतोष ठाकूर – तालुका प्रमुख उरण,
दीपक भोईर– तालुका संपर्कप्रमुख उरण,
गणेश शिंदे – माजी नगराध्यक्ष व गणनेते उरण विधानसभा हे सर्व पदाधिकारी या लढ्यात सहभागी आहेत. त्यांचा पाठिंबा सुद्धा आहे.त्यांच्या बरोबर संदीप जाधव – उरण शहर प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष,ओमकार विजय घरत तालुका संघटक, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष हे पदाधिकारी सुद्धा या लढायात सहभागी झाले आहेत.
या सर्व घडामोडींवर समाजात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेनेच्या या ठोस पावलांना लोकसमर्थन वाढत आहे. शाळा प्रशासन व शैक्षणिक अधिकारी यांनी योग्य ती कारवाई न केल्यास, शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष अटळ राहील, असा निर्धार शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.