‘अदानी’ महाघोटाळ्याविरोधात १३ मार्चला राजभवनवर धडक मोर्चा व ‘राजभवन घेराव : नाना पटोले
मुंबई, दि. ११ मार्च २०२३: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी जाब विचारत असून १३ तारखेला मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या हुकूमशाही कारभामुळे देश आर्थिक संकटातून जात आहे, त्यातच जनतेचा पैसा अदानीच्या घशात घालून त्यांनाही आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी अदानीचा फुगा लवकर फुटेल अशी भिती व्यक्त केली होती पण मोदी सरकार वेळीच सावध झाले नाही. विरोधी पक्षांचे मोदी ऐकतच नाहीत. अदानीचा फुगा फुटला आणि जनतेचा पैसा धोक्यात आला, हा पैसा बुडेल अशी भिती वाटते. काँग्रेस पक्षाने संसदेत अदानी महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली पण मोदी सरकारने या घोटाळ्यावर एक शब्दही काढला नाही, असे ते म्हणाले.