जि. प. शाळेतील संस्कारांची शिदोरी माझ्या पाठीशी : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मीही जिल्हा परिषद शाळेत शिकलो असल्याचे सांगून प्राथमिक शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आपण आज सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय अशिवेशन रत्नागिरीत ना. सामंत यांच्या उपस्थितीत पार पडले.

शिक्षणासाठी सर्वच संघटनांनी एकत्र येऊन शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून एक सक्षम पिढी घडविण्याचे काम केले पाहिजे, असे यावेळी त्यांनी शिक्षकांना आवाहन केले. पालकांपेक्षा शिक्षकांची जबाबदारी मोठी असून चांगली पिढी व आदर्श भारत घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडविण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचे शिक्षण देण्याचे काम प्राथमिक शिक्षकच करू शकतात. शिक्षक हे देशाच्या शिक्षणाचा पाया रचतात आणि समाजातील सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम सातत्याने करत असतात, असे देखील पालकमंत्री यावेळी म्हणाले.
शिक्षकांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम उपलब्ध असेल व सरकारच्या वतीने शिक्षकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचे काम करण्यात येईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व उपस्थित शिक्षकांना दिला.
या प्रसंगी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बसवडे सर, राज्य उपाध्यक्ष दीपक भुजबळ, राज्य प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत मेकाठे, नांदेड पतपेढीचे चेअरमन तुकाराम जाधव, जिल्हाध्यक्ष प्राविण काटकार्य यांसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.