अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा : केशव उपाध्ये
मुंबई : भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते. भ्रष्टाचाऱ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, अशी कठोर टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
देशमुख यांना प्रकृतीच्या कारणावरून याचना केल्यामुळे न्यायालयाने जामिनावर सोडले असताना, तुरुंगाबाहेर येणाऱ्या देशमुखांना स्वातंत्र्ययोद्ध्यासारखा सन्मान देत त्यांची मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचाराने बरबटलेला चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, असेही श्री. उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.