नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
- ७१ मंत्र्यांचे देखील शपथ ग्रहण ; ३० कॅबिनेट मंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.९) सायंकाळी राष्ट्रपती भवनात देश-विदेशातील खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. मोदी यांच्यासह ७१ मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर नरेंद्र मोदींचा रविवारी शपथविधी पार पडला. पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील अनेक नेते उपस्थित आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी शपथ घेतली. त्यानंतर जे. पी. नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्रातील 6 खासदांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये संधी
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पीयूष गोयल यांनादेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रविवारी झालेल्या शपथ ग्रहण सोहळ्यात मोदी यांच्यासह 71 मंत्र्यांच्या शपथ देण्यात आली.