हातिव शाळेचे नाचणी मळणी यंत्र जिल्हास्तरावर झळकणार!
विज्ञान प्रदर्शनात शाळेचे नाचणी मळणी यंत्र तालुक्यात अव्वल
देवरूख (सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्याचे ५० वे विज्ञान प्रदर्शन नुकतेच शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब येथे पार पडले.तालुक्यातील बहुतांश शाळांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये हतिव नं १ शाळेच्या नाचणी मळणी यंत्राला तालुक्यात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला.हे यंत्र दुर्वांक नार्वेकर आणि दिशा कोटकर यांनी शिक्षक सुनील करंबेळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहे.
कोकणातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून नाचणी हे एक महत्त्वाचे पीक आहे या पिकासाठी उपयुक्त आणि सोयीस्कर यंत्र अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाही त्यामुळे पारंपरिक पद्धतीने आजही नाचणीची मळणी केली जाते याचा विचार करून आम्ही हे यंत्र तयार केले असे सुनिल करंबेळे गुरूजी यांनी सांगितले.हे यंत्र सहजरीत्या कोठेही ने आण करता येते शिवाय याच्यामुळे शेतकऱ्याचे श्रम व वेळेची बचत होते.हे यंत्र अतिशय कमी खर्चात बनवता येते यामुळेच हे यंत्र परीक्षकांच्या पसंतीस उतरले.आता हे यंत्र दापोली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्याचे नेतृत्व करणार आहे या यंत्राला बहु उद्देशीय यंत्र बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे करंबेळे गुरूजी म्हणाले.
हे यंत्र बनवण्यासाठी पदवीधर शिक्षक विनय होडे,रुपाली मांगले व श्रीकांत केसरकर यांचे सहकार्य लाभले.हातीव शाळेची ही चौथी प्रतिकृती तालुक्यात अव्वल ठरली आहे या पूर्वी यांत्रिक मिक्सर, कुंभाराचे चाक,हिर सोलणी यंत्र,बहु उद्देशिय कुबडी अशा प्रकल्पांनी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक धोंडू करंबेळे गुरूजी, शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. आम. शेखर निकम व रोहन बने यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. या यशामुळे सर्व स्तरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.