कोकण रेल्वे मार्गावर विस्टाडोम कोचला प्रवाशांची पहिली पसंती !
मुंबई-मडगाव जनशताब्दीच्या विस्टाडोम कोचमुळे रेल्वेच्या तिजोरीत पावणे पाच कोटींचा महसूल
रत्नागिरी : रेल्वेने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावरील गाड्यांना जोडलेले विस्टाडोम कोच रेल्वेच्या तिजोरी चांगली भर घालत असल्याचे महसुलाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे मध्य रेल्वेने सुरु केलेल्या व्हिस्टाडोम कोचना चांगला प्रतिसाद मिळाला असून एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 1.29 लाखांहून अधिक प्रवाशांनी या कोचमधून प्रवास केला आहे.
मध्य रेल्वेच्या विस्टाडोम कोचेसनी वर्षभरात 1.29 लाखाहून अधिक प्रवाशांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. मध्य रेल्वे मुंबईहून गोवा तसेच पुणे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम कोच चालवत आहे.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार विस्टाडोम कोचमध्ये छतावर पारदर्शक काचा बसवण्यात आल्या आहेत. विस्टाडोम कोचच्या रचनेमुळे प्रवाशांना मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांचे तर मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाच्या चित्तथरारक दृश्यांचा आनंद घेणे कोचला असलेल्या रुंद आणि पारदर्शक खिडक्यांमुळे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते फेब्रुवारी 2023 पर्यंत, विस्टाडोम कोचने 1.29 लाख प्रवाशांकडून 17.16 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
यामध्ये एकट्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचमधून वर्षभरात 23,939 प्रवाशानी प्रवास केला. या कालावधीत कोचचे भारमान 100% पेक्षा जास्त ठेवण्यात गाडीला यश आले आहे. यामुळे या गाडीला मागील वर्षभरात 4 कोटी 72 लाख रुपये इतका महसूल नोंदवता आला आहे.
याचबरोबर पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनने ₹2.03 कोटींच्या कमाईसह 99% प्रवासी भारमान राखण्यात यश मिळवले आहे तर डेक्कन एक्सप्रेसने 27,370 प्रवाशांसह 100% प्रवासी भारमान मिळवत ₹1.83 कोटी कमाई केली आहे.
डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, जनशताब्दी, प्रगती एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या लोकप्रिय गाड्यांमध्ये हे डबे जोडल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विस्टाडोम कोच प्रवाशांना आकर्षित करत आहेत. यापैकी मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-करमाळी तेजस एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम डबे गेल्या वर्षी जुलै आणि सप्टेंबरमध्ये जोडण्यात आले होते. या दोन्ही गाड्यांच्या विस्टा डोम कोचेसना प्रवाशांकडून चांगल्या प्रतिसाद मिळताना दिसत आहे