नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड थांबा मिळवणारच!
संगमेश्वरवासीय प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण करणार – संदेश जिमन
संगमेश्वर : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकापेक्षाही कमी उत्पन्न मिळणाऱ्या स्थानकांवर मत्स्यगंधा एक्सप्रेसला थांबा देण्यात आल्याचे निदर्शनास आणत संगमेश्वरला नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला थांबा मिळवणारच, असा निर्धार करीत संगमेश्वरवासियांनी प्रजासत्ताक दिनापासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या संदर्भात उपोषणाचा इशारा देणारे निवेदन निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर ग्रुप तसेच संगमेश्वर वासी यांच्या वतीने आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पत्रकार संदेश जिमन यांनी दिला आहे.
नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळावा, यासाठी तीन वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही कोकण रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे जिमन यांनी म्हटलं आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाविरोधात 26 जानेवारी 2023 म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर ग्रुप, तसेच संगमेश्वरवासीयांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
संगमेश्वर रोड स्थानकातून रेल्वेस दर महिन्याला चांगला महसूल मिळत असतानाही कोकण रेल्वे प्रशासनाकडून हा दुजाभाव का केला जातो, असा प्रश्न संगमेश्वरमधील जनता विचारत आहे.
कोकणवासीयांचे मुंबईत मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यात संगमेश्वर तालुक्यातील 196 गावांतील चाकरमानी कामधंद्या निमित्त कोंकण ते मुंबई असा नेहमी प्रवास करत असतात . संगमेश्वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या थांबाव्यात, यासाठी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक ग्रुप वारंवार रेल्वे प्रशासनासी पत्रव्यवहार करीत आहे. त्यास स्थानिकांचीही मोठी साथ लाभली आहे. आहे. जनतेच्या या मागणीकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देऊन जनतेवर होणारा अन्याय दूर करेल असे वाटले होते, असे आंदोलनाची हाक दिलेल्या पत्रकार संदेश जिमन यांनी म्हटले आहे.
कोकणातील खासदार, आमदार, माजी रेल्वेमंत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. मात्र निगरगट्ट अधिकारी कोणतीही पावले उचलत नाहीत, असे संदेश जिमन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संगमेश्वर रोड पेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणार्या स्थानकांवर नेत्रावती व मत्स्यगंधा या एक्स्प्रेसना थांबा देण्यात आला आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे कायम नकारत्मक घंटा वाजविण्याची वृत्ती सोडून देऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने या दोन्ही गाड्यांना संगमेश्वर थांबा देण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा तसे नाही झाल्यास लोकशाही मार्गाने 26 जानेवारी 2023 ला संगमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात आमरण उपोषण करण्यात येईल.