रत्नागिरी-दिवा पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत धावणार?
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्य तसेच कोकण रेल्वेचे अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
रत्नागिरी : दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या स्वतंत्र नवीन गाडीसह सावंतवाडी -दिवा तसेच रत्नागिरी दिवा या दोन्ही गाड्या दादरपर्यंत चालवल्या जाव्यात, या कोकणवासीय प्रवाशांच्या मागण्यांवर शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी ना रावसाहेब दानवे यांनी रत्नागिरी दादर पूर्वीप्रमाणे दादरलाच नेण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यावर कोकण रेल्वे कोणती पावले उचलते याकडे प्रवासी जनतेचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी (दि. ३ मार्च २०२३ रोजी दुपारी ठीक ०१.०५ ते ०१.५० दरम्यान चर्चगेट येथील रेल्वे मंत्रालय – जनशिकायत कार्यालयात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कोंकण विकास समितीचे तसेच जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेच्या कोकण रेल्वे संदर्भातील प्रलंबित मागण्यांबाबत कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री संजय गुप्ता यांच्या समवेत चर्चा झाली.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड तसेच आमदार निरंजन डावखरे यांनी कोंकण विकास समितीचे खालील प्रलंबित प्रश्नांवर रेल्वे मंत्रालयाने पूर्तता करावी असे कोंकण विकास समितीचे वतीने सादर केलेले प्रस्तावातील मुद्दे रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांना पटवून दिले.
या चर्चेत जवळपास वीस वर्षांहून अधिक काळ दादरपर्यंत चालवण्यात आलेली आणि कोरोना संकटकाळानंतर दिव्यापर्यंतच थबकलेली पूर्वीची रत्नागिरी दादर पॅसेंजर आणि आताची रत्नागिरी- दिवा एक्सप्रेस गाडी ही पूर्वीप्रमाणेच दादरपर्यंत चालवण्या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही गाडी प्रवाशांच्या मागणीनुसार दादरपर्यंतच नेण्याचे सूचित केले. त्यामुळे आता मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेकडून यावर कार्यवाही कधीपासून होते, याकडे सर्व सामान्य प्रवासी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे