Konkan Railway|माकडांच्या उड्या कोकण रेल्वेला पडतायत लाखो रुपयांना!
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी माकडांना रोखण्याकरिता रेल्वेने काढली निविदा!
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन गेल्या वर्षी त्याचे लोकार्पण देखील झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल कोकण रेल्वेची प्रशंसा देखील केली. कोकण रेल्वेच्या याच विकृतीकरण पूर्ण केलेल्या मार्गावर विद्युत इंजिनसह गाड्या देखील धाऊ लागल्या आहेत. मात्र, विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स तसेच मास्टस यावर जवळपासच्या रानातली माकडे उड्या मारू लागल्याने कोकण रेल्वेला त्यांना रोखण्यासाठी लाखो रुपयांची निविदा काढावी लागले आहे.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील OHE पोर्टल्स तसेच मास्ट्स यावर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर रेल्वे गाड्या चालतात त्या रेल्वेच्या ओव्हर हेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.
माकडांमुळे रेल्वेच्या विद्युत प्रवासात खंड पडू नये व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कोकण रेल्वेने सुमारे 6 लाख 62 हजार 663 रुपये इतक्या अंदाजीत खर्चाची निविदा देखील काढली आहे. यामध्ये कोकण रेल्वेच्या माकड प्रवण भागामध्ये त्यांना रोखण्यासाठी रत्नागिरी ते राजापूर या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत.