डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Team RatnagiriLive
2 Min Read

चिपळूण  : डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिलजी चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास लघु पाटबंधारे विभागाच्या निवृत्त कनिष्ठ अभियंता तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्राची जोशी आणि आंतरराष्ट्रीय रायफल शूटर व समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सौ. यशिका सिद्धार्थ निकम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेच्या संचालिका तथा वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे, गोविंदरावजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शामिका चोरगे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन तांबेकर उपस्थित होते. प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत शिस्त, संस्कार आणि चारित्र्य जपावे, असे आवाहन केले.

डॉ. निखिल चोरगे यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सौ. प्राची जोशी यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. सौ. यशिका निकम यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उत्तम करिअर करता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला. ५९व्या युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुप्रिया चौगुले यांनी केले. प्रा. संदिप येलये यांनी प्रास्ताविक केले, तर कु. अनिकेत वलावटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment