- शिरोडा-वेळागर येथील ताज हॉटेल प्रकल्पासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय करार संपन्न
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नेणारा एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित ताज हॉटेल (Taj Hotel) प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार मंत्रालयात अधिकृतपणे संपन्न झाला. यामुळे सिंधुदुर्गमध्ये पर्यटनाची नवी पहाट उगवली आहे.
मंत्रालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करार स्वाक्षरीत
हा महत्त्वपूर्ण करार मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार, आणि पर्यटनमंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी आमदार श्री. दीपकजी केसरकर, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्गतील पहिले पंचतारांकित ‘ताज’ हॉटेल: मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे
- जागतिक दर्जाच्या सुविधा: या पहिल्या पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आदरातिथ्य (Hospitality) उपलब्ध होईल.
- रोजगार निर्मिती: स्थानिक तरुणांसाठी थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील.
- व्यवसाय आणि स्वयंरोजगार: स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांसाठी व्यवसाय व स्वयंरोजगाराचे नवीन मार्ग खुले होतील.
- प्रादेशिक अर्थव्यवस्थेला गती: पर्यटकांचा ओघ वाढल्याने कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्मातील प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल.
निसर्गाची साथ आणि ‘ताज’ची जोड
सिंधुदुर्गचा नयनरम्य समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले, समृद्ध वनसंपदा आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा यापूर्वीच पर्यटकांना आकर्षित करत आला आहे. आता यात ‘ताज हॉटेल्स’ च्या ब्रँडची जोड मिळाल्याने सिंधुदुर्ग हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.
