संगमेश्वर रेल्वे स्थानक ते देवरूख अतिरिक्त एसटी फेऱ्यांना मंजुरी

Team RatnagiriLive
2 Min Read
  • माळवाशीतील सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांचा पाठपुरावा

संगमेश्वर : संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून देवरुखकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेने संगमेश्वर येथे येणाऱ्या प्रवाशांना देवरुखकडे जाण्यासाठी आता अधिक चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी १४ जुलै २०२६ रोजी या संदर्भात एसटी महामंडळाकडे निवेदन देऊन अतिरिक्त फेरी सुरू करण्याची मागणी केली होती. परिवहन मंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला होता.


या मागणीची दखल घेत रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी देवरूख आगाराला अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या देवरूख आगारामार्फत दुपारी २ वाजताची रेल्वे स्थानक–संगमेश्वर–देवरूख फेरी सुरू आहे. मात्र रेल्वेने संगमेश्वर येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एका एसटी बसमधून सर्व प्रवाशांना देवरूखकडे जाता येत नाही. परिणामी अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी त्यांना मोठे भाडे मोजावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने एसटीची एकच बस अपुरी पडत होती. त्यामुळे उर्वरित प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता. या प्रवासासाठी मनमानी पद्धतीने सुमारे ५०० ते १००० रुपये भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रारही करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर सकाळी 11.30 व दुपारी 12.30 वाजता करजुवे व माखजनहून सुटणाऱ्या फेऱ्या रेल्वे स्थानकावरून सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे रेल्वेने संगमेश्वर येथे येणाऱ्या आणि देवरुखकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे स्थानकावरून देवरुखकडे जाण्यासाठी एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन एसटी महामंडळाने अतिरिक्त फेरीला मंजुरी दिल्याने तालुक्यातील प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment