आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर ‘कोकण दर्शन’मध्ये नवरात्र विशेष उत्सवी पर्यटन

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी :  रत्नागिरीतील विविध शक्तिस्थानांची माहिती आणि कोकणातील पारंपरिक धार्मिक प्रथा-परंपरांचा वेध घेणारा ‘कोकण दर्शन’चा नवरात्र विशेष उत्सवी पर्यटन कार्यक्रम शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.


या विशेष कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या शक्तिस्थानांची माहिती देण्यात येणार आहे. गणपती इतकाच रत्नागिरीतील नवरात्र देखील धुमधडाक्यात साजरा होतो. या नऊ दिवसात रत्नागिरीतील वेगवेगळ्या शक्ती स्थानांना वेगवेगळ्या ठिकाणाहून कुलदेवतेच आवर्जून दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. त्यानिमित्ताने उत्सवी पर्यटनाचा ओघही वाढतो. त्याचबरोबर कोकणस्थ परिवारात नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी उभी करण्याची परंपराही उलगडण्यात येणार आहे.


कोकणस्थ परिवारातील या परंपरेमध्ये तांदळाच्या पिठापासून मुखवटा तयार करून महालक्ष्मी उभी केली जाते. विशेष म्हणजे आजच्या काळात ही परंपरा महिलांकडून जपली जात असून, मुखवटा तयार करण्याची ही पारंपरिक कला महिलाच पुढे नेत आहेत.
कार्यक्रमात दाभोळच्या चंडिका देवीविषयी संदीप सावंत माहिती देणार आहेत. महालक्ष्मीच्या परंपरेविषयी अमृता बापट सांगणार असून, तांदळाच्या पिठापासून महालक्ष्मीचा मुखवटा तयार करण्याची पद्धत आणि त्यामागील प्रक्रिया तेजश्री भावे सांगणार आहेत.
‘सफर रत्नागिरितील प्रसिद्ध शक्तिस्थाने आणि अष्टमीच्या महालक्ष्मीची’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचे असून, सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४० वाजता, आकाशवाणी रत्नागिरीच्या ११४३ किलोहर्ट्झ मध्यमलहरी आणि १०१.५ मेगाहर्ट्झ एफ.एम. वाहिनीवर ऐकता येणार आहे. कार्यक्रमानंतर AIR रत्नागिरीच्या YouTube चॅनेलवरही तो श्रोत्यांसाठी उपलब्ध होईल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment